गणपती पूजा कधी सुरु झाली?
लहानपणापासून गणपती हा माझा सगळ्यात आवडीचा देव आहे. त्याच्या विविध रूपात कलात्मक रित्या साकारलेली लग्नपत्रिकेवरची चित्रे मला साठवायला आवडायचे. गणेशोत्सवाची प्रतीक्षा पावसाळा सुरु झाली कि लगेच लागायची. आमच्या गावातले मूर्तिकार मोहन कुंभार यांच्याघरी जाऊन मला आवडता फोटो दाखवून, "मला असा गणपती बनवून पाहिजे" म्हणून मी मागे लागायचो आणि ते पण त्यांच्या गडबडीत माझ्या बालहट्टाला तयार व्हायचे. माझे वडील फार कडक स्वभावाचे होते पण माझी आवड समजून घेऊन त्यांनी कधी मला मोठा गणपती घेण्यापासून रोखले नाही. आमच्या वाड्यातले गणपती विसर्जन गौरी बरोबर झाले तरी आमचा गणपती सार्वजनिक गणपती सारखा दहा दिवस असायचा. दहा दिवस गणपती, आरत्या आणि मंडळांनी रात्री ठेवलेले विडिओ रेकॉर्ड वाले सिनेमे बघण्यात कधी जात होते, कळत न्हवते.
चित्र: तिबेट चा विनायकएक उत्सव म्हणून गणपती म्हणून बघत असलो तरी लहानपणापासून त्याच्या वेगळ्या रूपाबद्दल जिज्ञासा होती. सुरवातीला दंतकथा मधून तो किती चमत्कारी आहे अस समज होता पण हायस्कुल ला गेलो तेव्हा तो बुद्धी आणि कलेची कशी देवता आहे आणि त्याच्या स्वरूपामधली सांकेतिक मांडणी जसे कि छोटे डोळे म्हणजे बारीक नजर, हाताचे डोके म्हणजे बुद्धी चे प्रतीक वगेरे वगेरे . पण जसा मी दक्षिण पूर्व देश थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया इथे फिरलो आणि तिथे पण गणपती ची वेगवेगळ्या रूपात होणारी पूजा बघून आणि जी माहिती मिळेल ती वाचत आणि जसे उमजत गेले तसे समजून घेत गेलो. मला ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत न्हवती आणि तसे प्रश्न इतर लोकांनापण पडत असणार म्हणून ते खाली मांडत आहे.
गणपती हा फार प्राचीन देव आहे, प्रथम पूजा त्याची साधारण २५०० वर्षांपूर्वी बुद्ध काळात सुरु झाली जिथे तो विघ्नहर्ता रूपात रक्षक देवता मनाला जातो. पुढे हि परंपरा हिंदू धर्मात पण काही बदल घडून तो बुद्धी आणि कलेची देवता पण झाला. बुद्ध काळातला बाप्पा मंगलम हा प्राचीन खरिपाच्या सुगीमधला सण पुढे जाऊन गणेशोत्सव रूपात पुढे रूढ झाला. गणपती चा दुसरा अर्थ रयतेचा राजा/पालक असा होतो, मौर्यकालीन उगम असल्यामुळे 'गणपती बाप्पा मोरया या' घोषणेचा अर्थ मोर्य राजा पिता आहे असा असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. पेशवे काळात गणेश उपनिषद (अथर्वशीर्ष) चे लिखान झाले आणि गणेशोत्सव ला राजाश्रय मिळाला आणि मराठा साम्राज्यासोबत तो देशभर पसरला. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणून गणेशोत्सव सामाजिक चळवळ उभी केली. हिंदी सिनेमा च्या गाण्यांनी अजून तो देशभर लोकप्रेय बनत गेला.
हे सगळे बदल झाले असले तरी मूळ संकल्पना अष्ट विनय (अष्टांग मार्ग) शी निगडित आहे, अष्टविनायक हि एक तात्विक संकल्पना आहे ना कि फक्त फिरून यायची ठिकाणे. या आठ गोष्टी जर आपण आचारात आणल्या तर आपले आयुष्य हे सुखाने भरून जाईल (सुखकर्ता) दुःख संपून जातील ( दुःखहर्ता). दंतकथा फक्त आपल्यापर्यन्त पोचल्या पण अर्थ नाही.
आपण जर अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर गणपतीची खऱ्या अर्थाने पूजा होईल आणि जीवन अधिक सुखमय होऊ शकेल. बुद्धानी सांगितलेलं आणि गणेशरूपाने ज्याची पूजा आपण करतॊ हे अष्टांग मार्ग खालीलप्रमाणे आहेत. या मार्गांचे अनुकरण करणे हे हार आणि फुले घालून करता येणाऱ्या पूजेएवढे सोपे नाही.
१. दृष्टीकोण - योग्य द्रुष्टी
२. संकल्प - योग्य निर्धार
३. वाणी/वाचा - योग्य बोलणे
४. कर्म = योग्य काम
५. उपजीविका - योग्य व्यवसाय
६. व्यायाम - योग्य प्रयत्न
७. स्मृती - योग्य विचार
८. समाधी - योग्य एकाग्रता
हे आठ मार्ग सोपे होण्यासाठी ते जीवनाच्या तीन विभागात पण सांगितले आहेत.
१. प्रज्ञा - दृष्टीकोण , संकल्प
२. शील - वाणी,कर्म, उपजीविका
३. समाधी - व्यायाम, स्मृती, समाधी
ज्याअर्थी गणपतीची विविध रूपे आहेत तसे अर्थ पण अनेक आहेत आणि आपल्या बुद्धीला जो पटतो तो आपण घ्यावा कारण खरे आहे आणि बाकी खोटे आहे असे नाही.
यावर्षी मी गणपती स्वतः बनवायचे ठरवले आणि यूट्यूब ची मदत घेऊन तो बनवताआला, यात मला आणि माझ्या दोन मुलांना फार मजा पण आली. लहानपणाची आठवण झाली, मी माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या मित्रांसोबत साधारपणे सहावीत असताना ललकार बालगणेश मित्र मंडळाची स्थापना केली होती, ते मंडळ अजून हि चालू आहे नव्या रूपात आणि न्यू सहकार अशा नवीन नावासोबत. हे मी सांगायचे कारण हे कि या गोष्टीचा माझ्या जडण घडणीवर मोठा परिणाम झाला आणि त्याचा फायदा पुढे जाऊन कॉलेज मध्ये आणि पुढे बिझिनेस सुरु करताना झाला. कारण टीम बनवून काम कसे करायचे हे त्या मंडळाने शिकवले होते.
एक गाव एक गणपती हा चांगला उपक्रम आहे पण मला वाटते कि पर्यावरण पूरक गेणशोत्सव साजरा केला गेला तर तो घरोघरी साजरा व्हायला हरकत नाही. एकदा वापरून टाकून द्यायच्या प्लास्टिक ची आरास टाळा, मूर्ती मातीचीच घ्या आणि विसर्जन करताना पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. जर ज्ञानआणि बुद्धीच्या देवाची पूजा अंध आणि अज्ञान पद्धतीने केलो तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही.
क्रमशः गणपती चे कुटुंब आणि त्याची दोन मुले तुम्हाला माहित आहेत का?