स्मरण पंधरवडा
Written by: संगीता थोरात.
माझ्या मैत्रीणीचा फोन आला , ती म्हणाली , "संगीता तुला माहिती आहे ना , माझ्या सासूबाई मागच्या वर्षी गेल्यात आणि अता महालय सुरू होतंय तर त्यांच्या नावाने एकजणीला जेवायला बोलवायचं आहे, तर, तुला चालेल का...?
कारण , मी आत्ताच माझ्या सासुबाईंच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये एक- दोघीला फोन केला तर त्या म्हणाल्या , की आम्ही श्राद्धाचं जेवत नाही म्हणून, म्हटलं तुझ्याशी बोलावं."
मी तिला म्हंटल की "अगं जेवायला येणं न येणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . परंतु , आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रम्ह मानलं जातं मग ते श्राद्दाचं की बारशाचं....?
त्यात बदल होतो का....?
आणि मी जर अशा गोष्टी मानत असेल तर मी ही एक दिवस जाणार आहे ना.....?
हा प्रत्येकाच्या विचारसरणीचा प्रश्न आहे . तेव्हा काळजी करू नकोस मी येईन जेवायला ."
सारिका म्हणाली . "मला खूप बरं वाटलं ग, अता कुणाला शोधायचं म्हणून मला खरंच खूप टेन्शन आलं होतं .तसं मी आईंच्या नावे अनाथाश्रमात पण जेवण पाठवणार आहे परंतु, आपल्याकडं घरात जेवायला बोलवतात म्हणून....."
सारिकाला येते म्हणून सांगून मी फोन ठेवला. मात्र मनांत म्हंटलं की
जर एकविसाव्या शतकातील बदल सहजपणे स्वीकारत असू तर वैचारिक मानसिकता.....?
ती सुद्धा सकारात्मकतेनं नाही बदलली गेली तर आपण माणूस या नात्यानं आपलंच नुकसान करून घेत नाही का.....?
हा पंधरवडा म्हणजे पितृश्राद्धाचा म्हणून ओळखला जातो.
खरंतर ज्याच्यावर आपली श्रद्धा ते श्राद्ध ,
आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संस्कारात, परंपरेनं माणसां विषयी , निसर्गा विषयी , पशू पक्ष्यां विषयी वेगवेगळ्या सणवारांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली जाते .
कारण आपली भारतीय संस्कृती दान , धर्म , परोपकार , त्याग , या अढळ संस्कार मूल्ये असणाऱ्या पायांवर उभी आहे .
मग ती जिवंत जीवांविषयी असो वा आपल्या पूर्वजां विषयी असो , आजचे आपले जे अस्तित्व आहे ते सर्व थोर क्रांतिकारक , समाज सुधारक, महापुरूष , महामानव, संतमंडळी , पूर्वज वाडवडील यांच्या मुळेच !
म्हणजेच आजची पिढी ही कालच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते.
भाद्रपद पौर्णिमे पासून अश्विन अमावस्या म्हणजेच सर्व पित्री अमावस्या पर्यंत पितृ श्राद्ध घातले जाते .
या पंधरा दिवसातील एक दिवस तिथी नुसार आपल्या सर्वच पूर्वजांचे तसेच गुरुं, सहकारी , आप्तेष्टांचे स्मरण करुन श्राद्ध विधी केले जाते. त्यांच्या स्मरणार्थ दान , धर्म केला जातो.
जेव्हा शेकडो वर्षा पूर्वी कोणत्याही सोयी , सुविधा नव्हत्या . आजच्या सारखी कोणतीही साधनं उपलब्ध नसताना , आपल्या या पूर्वजांनी अनेक खस्ता खाऊन , हाल अपेष्टांचा सामना करुन , अनेक प्रसंगी जीवाचे मोल अर्पण करून आपला देश, आपलं स्वराज्य , आणि राज्य अटोकाट प्रयत्नपूर्वक संरक्षण केलं , जतन करून वाढवलं केवळ त्यांच्यामुळेच आज आपण आहोत हा कृतज्ञता भाव यांतून व्यक्त होत असतो.
पूर्वजांनी आपल्या कुटुंबा साठी दिलेलं योगदान त्याचे स्मरण करून त्यांच्या आदरभावा प्रति
या काळात दिले जाणारे पाणी किंवा तर्पण हा जरी कर्मकांडाचा भाग असला तरी ( कर्मकांड ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार ) व्यक्ती किंवा समाज मानसिकतेचा विचार केला तर आपुलकी , जिव्हाळा , एकमेकां विषयी प्रेम या माध्यमातून व्यक्त करायचं म्हणून त्याला तर्पण म्हटल गेलं असावं.
माझी आजी जी धार्मिक , अध्यात्मिक आणि practical असणारी , रोज देवपूजा करताना अगदी पशु , पक्षी , मुंग्या , चिमण्या , जीव , जंतूना देखील नैवेद्य अर्पण करायची . आणि तरी देखील वर्षातून एकदा हे श्राद्धही जेवू घालायची . एकदा मी तिला विचारलं , " रोज जर तु सर्व जीवांना नैवेद्य अर्पण करतेस , तर मग पुन्हा हे वेगळं श्राद्ध , नैवेद्य कशासाठी...?
तेव्हा आजीनं सांगितलं की , " साधारण गणपती पासूनच्या या काळात सृष्टीचं भरण , पोषण झालेलं असतं. शेतं हिरव्या ओटीनं सजलेली असतात . त्यामुळं पंचतत्व म्हणजे , पृथ्वी , आप, तेज, वायु आणि आकाश हे उफाणावर असतात .
याच काळात पंचतत्वांचा प्रभाव दिसून येतो असं अध्यात्मात देखील सांगितलं जातं.
निसर्गाचाच नियम म्हणजे निसर्ग सृष्टीचे खऱ्या अर्थाने भरण पोषण करतो.
मूठभर पेरलेल्या धान्यातूंन ओंजळ भरभरून धान्य मिळतं. एका छोट्याशा बीजातूंन वटवृक्ष तयार होतो . निसर्ग आपल्याला भरभरून देतच असतो.
ही निसर्गाची खूप मोठी किमया असेल तर मनुष्याने निसर्गाचा हा संस्कार आपल्या मनामध्ये बिंबवला पाहिजे .
निसर्गाने सांगितलेला हा दातृत्वाचा भाव मानवी मनावर संस्काराचा किती तरी मोठा प्रभाव निर्माण करणारा आहे .
केवळ परंपरा म्हणून या रीती रिवाजांकडे न बघता आपल्या या पूर्वजांचे पुण्यस्मरण करणे , त्यांच्या आशीर्वादाने , त्यांच्या आचार , सद्विचार , तत्त्वांना स्मरण करणं . शक्य ते आपल्यात उतरविण्याचा प्रयत्न करणं आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्याची ही संकल्पना खूप उदात्त स्वरूपाची आहे हे लक्षात येतं. केवळ परंपरे कडे न पाहता त्यामागे व्यापक विचारांचे ऋण केवढे मोठे आहे हे समजून घ्यायला हवं.
जेव्हा एखादं मूल हुशार , संस्कारशील , गुणी असतं तेव्हा या संस्कारांची पाळंमुळं आधीच्या पिढीतील किंवा त्या पिढीनं ती बीजं रूजवलेली असतात .
शहाजी राजे भोसलेंचे वडील मालोजी राजे भोसले अन्याय , अत्याचार जुलूम सहन न करता मुघलांच्या विरूद्ध लढले .पुढची पिढी म्हणजेच शहाजी राजांनी मुघलांच्या चाकरीत राहून देखील स्वराज्याचा विचार करत बंड उभारलं होतं परंतु त्यावेळी ते बंड यशस्वी झालं नव्हतं. मात्र मुघलांच्या चाकरीत राहून देखील शहाजी राजांनी आपल्या लेकराला स्वाभिमानाचं बाळकडू पाजलं . जिजाऊनं या हुकूमशाही राजवटी विरूद्ध विचारांचा , संस्काराचा अंगार फुलवला, आई भवानीच्या आशीर्वादानं , छत्रपतीं शिवप्रभूंच्या रूपात हिंदवी स्वराज्याचा पराक्रम साकारला.
मात्र महाराजांनी कधीही अमावस्या , पौर्णिमा, शनिवार , बुधवार , शुभ , अशुभ पाहिलं नव्हतं हे ही ध्यानात घ्यायला हवं.
स्वराज्याचं हे बीज तीन चार पिढ्यांच्या आधीच रूजवलं गेलं होतं जे स्वराज्याच्या रूपानं फुललं आणि फळांस आलं.
आमच्या आजच्या जगण्यासाठी कित्येक जीवांनी आपला जीव गमवला आहे .
कोणत्याही जात, पात , धर्म , पंथाचे आम्ही असलो तरी आमच्या या सर्व पूर्वजांचं रोजच्या जगण्यात...? त्याचं साधं स्मरण , योगदान , आठवण देखील आम्ही करत नाही याचं कारण आम्हांला सर्व काही फुकट मिळालेलं आहे .
आणि सर्व काही मोफत , फुकट मिळाले की त्याची किंमत नेहमीच शून्य वाटते.
कोणताही धर्म , कोणताही धर्मग्रंथ माणसाला विचार करायला शिकवतो. मानवता हाच एकमेव जात, पंथ , धर्म असावा. आणि निसर्ग नियमाचं पालन असावं . हेच आमच्या शेकडो वर्षांपासून जन्मांस आलेल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं , कथा सांगितल्या , कीर्तनं केली, दानाचं महत्त्व सांगितलं . त्यासाठी मात्र पैशानंच श्रीमंत असणं गरजेचं नाही . मनाची श्रीमंती महत्वाची . भुकेल्यास घासातला घास आणि घोटभर पाणी दिलं तर ते ही दान होतं . मात्र त्यासाठी आमच्या मनांत दानत असणं महत्वाचं . अपरिग्रह म्हणजे फक्त जमा करणं , मी आणि माझ्या पुरतं न राहता , जे आपल्या कुवतीनुसार असेल ते आपण करू शकतो. मग ते त्यांच्या एखाद्या विचारांच स्मरण करणं , त्याचं कर्तृत्व आठवणीत उजळणं निदान इतकं तर आपण नक्कीच करू शकतो .
आजच्या नवीन पिढीला हे सर्व समजावणं आपली जबाबदारी आहे की हे कशासाठी आणि का करायचं..? ते समजून सांगता यायला हव. यानिमित्तानं दोन घास एखाद्या गोर गरीब लेकरांच्या पोटात गेले किंवा एखाद्या अनाथ आश्रमातील प्रेम आणि मायेसाठी आसुसलेल्यां जीवांस मिळाले तर पुण्य किती मिळेल हे नाही सांगता येणार पण त्या भुकेल्या जीवाचा आत्मा नक्कीच तृप्त होईल .
आणि आपली नवीन पिढी देखील ही positively आनंदानं हे स्वीकारेल नक्की नाही का......?
एक घडलेली घटना आठवते..
काळे काकींना चार मुली आणि एक मुलगा . मुलं लहान असतानाच काळे काका गेले .
पण खंबीरपणे संसार सांभाळत काकींनी दोन मुलींना सोबत घेत मजुरी करून , खडतर संघर्ष करत डोक्यावर छत उभारलं ,दोन एकर शेती घेऊन शेताच्या बांधावर मुला नातवंडाना सगळी फळं खायला मिळावी म्हणून सगळी फळझाड लावली . डोक्यावर पाणी आणून झाडं वाढवली .
मुलींची लग्न केली . मुलाला शिक्षण देऊन लग्न केलं.
काकी त्या घरातील एक व्यक्ती नाही तर एक शक्ती होत्या .
वृद्धापकाळानं काकी गेल्या तेव्हा मुलींनी विचार केला की आईनं आयुष्यभर कष्टानं मिळवलेल्या शेतातच रक्षा विसर्जित करून त्यावर झाडं लावावी.
मात्र सुनेनं , मुलानं आक्षेप घेतला की , " तुम्ही जाल सासरी निघून पण म्हातारी भूत होऊन आम्हाला त्रास देईल. आम्ही तिला पितृपक्षात नैवेद्य देऊ पण हे असलं काही होऊ देणार नाही म्हणत आकांडतांडव केला.
अशा दुःखाच्या प्रसंगी नाईलाजाने मुलींनी माघार घेत रक्षा नदीत जाऊन विसर्जित केली .
काकींनी कष्टानं उभारलेला सगळा संसार सुनेला , मुलाला चालणार होता , त्या संसारात काकींचा जीव नसेल का राहिला.....?
काकींनी आपल्या कर्तृत्वानं आपलं आईपण आणि मातृत्व सिद्ध केलं होतं पण ......तिचं आईपण मातृत्व आणि वात्सल्य मात्र सत्पात्री , सत्कारणी लागलं नव्हतं .
जिवंत असताना अन् गेल्यानंतरही विटंबना झाली .
वर्षातून एकदा नव्हे रोज जरी त्यांच्या नावे पंचपक्वान्नाचा नैवेद्य दिला तरी..........
खरंतर सध्या गेलेल्या माणसां पेक्षा जिवंत माणसांची जास्त भिती वाटावी अशी भयाण परिस्थिती आहे .
घरात अंधार झाला तर दिवा लावता येतो पण मनातल्या अंधाराचं , मनांतल्या या भूतांचं काय करायचं.....?
असं म्हणतात की विचारांचा अंधार हा रात्रीच्या अंधारा पेक्षा भयानक असतो. सकारात्मकतेनै विचार करून पलिकडे जेव्हा जाऊ तेव्हा विचारांचा अंधार मिटून उषःकाल झालेला नक्कीच दिसेल.
या पंधरवड्या नंतर घरोघरी स्वच्छता , साफ सफाई करून घरातील जाळी , जळमटं, केरकचरा , जुन्या टाकाऊ वस्तू बाजूला सारत कोपरान् कोपरा निर्मळ करून त्यासोबत घराचा परिसर स्वच्छ ठेवत पुढे घटस्थापना म्हणून घरोघरी सृष्टीची निर्मात्या आईच पूजन केलं जातं . लागूनच दसरा , दिवाळी येते मग घरातील स्वच्छता करून घरासमोर सडा, रांगोळी , एखादा दिवा लावला तर घराला आणि अंगणालाच नाहीतर मनाला देखील प्रसन्नता लाभते . यानिमित्तानं घरासोबतच मनाचं देखील स्वच्छता अभियान करता आलं तर.....?
म्हणजे मनातील जुनाट, बुरसट विचारांची , एखाद्या विषयी मनांत धरून ठेवलेली अढी, द्वेष , राग, तिरस्कार , इर्षा , समज , गैरसमज , पुर्वाग्रह , अहं हे आपल्या पुरतं काढून टाकता आलं अन् तिथे सकारात्मक विचारांची पेरणी करता आली तर घर आणि अंगणा सोबतच मनांच देखील सुशोभिकरण नक्कीच होईल .
हजारो वर्षापासून आमच्या भगवान बुद्धां पासून ते रामदास स्वामी , अगदी गाडगे बाबा , तुकडोजी बाबा, ( ही यादी बरीच मोठी होईल ) सर्वांनीच मनाला सुशोभित म्हणजेच मन निर्मळ राखण्याची शिकवण आम्हाला दिलेली आहे .
आपल्या भारतभूला इथल्या पवित्र मातीला जो दिव्य इतिहास लाभलाय तो क्वचितच एखाद्या देशाच्या सद्भाग्यात असेल इतके आपण भाग्यवान आहोत .
आणि सर्वात महात्वाचं म्हणजे जगाला बदलण्यापेक्षा स्वतःत बदल करणं तेच एकमेव आपल्या हातात आणि हितात देखील असतं नाही का...?
.............संगीता थोरात.